दिवस जसा सरत जातो
अंधार जसा पडत जातो
सगळे रंग आपली साथ सोडतात
नेत्र मिटले तरी जो आपल्या बरोबर राहतो
तो एक काळा रंग असतो
वेदना होता आपल्याला , हा लगेच धावून येतो
भुकेने भोवळ आलेल्याला , हाच येउन धीर देतो
डोळस माणसा बरोबरच , तो अंधाचीही साथ देतो
प्रकाशाला देखील , जो आपल्यात सामावून घेतो
तो एक काळा रंग असतो
आपल्या प्रत्येक आनंदात तो आपल्या बरोबर असतो
दु:ख होता आपल्याला , आपण नेत्र मिटून त्यालाच बोलावतो
ईश्वराची प्रार्थना करताना , हा आपल्या बरोबर उभा राहतो ,
निषेध करतानाही , जो आपले निशाण बनतो
तो एक काळा रंग असतो
रंग काळा कृष्णाचा , रंग काळा रामाचा
रंग काळा राक्षसांचा, रंग काळा दानवांचा
रंग काळा स्वप्नांचा, रंग काळा कल्पनेचा
रंग काळा अंधाराचा, रंग काळा अतिप्रकशाचा
शून्याचा रंग देखील काळाच आहे
काळयाविना जग अपूर्ण आहे
कवी: आदित्य तळवलकर